घोडावत विद्यापीठात व्याख्यान संपन्न
‘भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि युवक’ या विषयावर संजय घोडावत विद्यापीठात स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि रोहित कुमार सिंह यांचे व्याख्यान झाले. यावेळी स्वामीजी म्हणाले,की युवकांनी स्वयंशिस्त बाळगल्यास भारत विश्व गुरु बनेल.युवकांनी प्रत्येक काळात भारताचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे ते म्हणाले,की आम्हाला झाशीच्या राणीसारखी युवती आणि अभिमन्यू सारखा युवक पाहिजे जो राष्ट्राच्या संरक्षणासाठी बलिदान देईल, पण अन्याय विरोधात कोणापुढे झुकणार नाही. देशाला प्रभू रामा सारख्या युवकाची गरज आहे. मला शिवाजी महाराजांच्या भूमीत आल्यानंतर नेहमीच चांगले वाटते.
यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या व्याख्यानाची सुरुवात झाली.विश्वस्त विनायक भोसले यांनी स्वामी अभिषेक ब्रह्मचारी व युवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांचे स्वागत केले.
यावेळी रोहित सिंह म्हणाले की तिलका मांझी, मंगल पांडे,राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा,भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मिल,अश्फाकुल्ला खान,वैकुंठ शुक्ला यांसारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे.शहीद भगतसिंग यांनी आपले बलिदान भारतात लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी दिले होते. युवकांनी गरिबांच्या कल्याणासाठी व लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करावे.महाराष्ट्रातील जनतेने देशाच्या संस्कृती संवर्धनामध्ये महत्त्वाचे काम केले आहे.
या व्याख्यानाप्रसंगी पाच हजार विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.