अंबपमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाचा निघृण खून

   अंबप ता. हातकणंगले  येथे अनैतिक संबंधातून कुऱ्हाडीचा घाव घालून एका तरुणाचा निघृण खून करण्यात आला. अमीर करीम मुल्ला (वय २९, रा. अंबप, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. काल दुपारी सव्वाबाराच्या सुमारास प्रकार घडला.या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी संशयित कुमार ऊर्फ खंडू वाघमोडे याला अवघ्या दोन तासांतच जेरबंद केले. या प्रकरणी मृताचे वडील करीम हमदूल मुल्ला (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे.
     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार संशयित खंडू ऊर्फ कुमार वाघमोडे अंबप परिसरात दररोज मेंढ्या चरविण्याचे काम करतो. मुल्ला याचे मटण शॉप आहे. करीम व त्यांचा मुलगा अमीर दोघे हा व्यवसाय करतात. मटण दुकानापासून जवळच संशयित खंडू वाघमोडेचे वास्तव्य आहे. ओळखीतून वाघमोडेच्या पत्नीसोबत अमीरचे प्रेमसंबंध जुळले होते. हा सारा प्रकार दोन वर्षांपूर्वी उघडकीस आला. त्यानंतर स्थानिकांनी बैठक घेतली होती. समज देऊन हा वाद मिटविला होता. मात्र त्यानंतरही प्रकरण पुढे सुरूच असल्याची शंका वाघमोडेला होती. त्याने वेळोवेळी अमीरला समजावले होते; मात्र अमीरने दुर्लक्ष केले होते.
     दरम्यान, काल  सकाळी साडेअकराच्या सुमारास अमीर व त्याचा मित्र संदीप वाघमोडे बकरे आणण्यासाठी गणेश मंदिरापासून कापसे पाणंदीतून आंबेडकरनगरकडे गेले होते. तेथून परत येत असताना त्याच रस्त्यावर खंडू वाघमोडे बकरी चारत होता. तेथे दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळला. या वादातून रागाच्या भरात खंडूने हातात असलेल्या धारदार कुऱ्हाडीने अमीरच्या मानेवर व खांद्यावर घाव घातले. अचानक झालेल्या हल्ल्याने अमीर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मानेतून रक्ताचा अक्षरशः पाट वाहिल्याचे दिसत होते.

    संदीप वाघमोडे याने अमीरच्या वडिलांना माहिती दिली. अमीरचे वडील व पत्नी घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमीरला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच अमीरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, ही घटना कळताच वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भीमगोंडा पाटील, उपनिरीक्षक गिरीश शिंदे, लक्ष्मण सरगर, श्रीकांत दाभोळकर, मिलिंद टेळी, प्रमोद चव्हाण, महेश गायकवाड, जितेंद्र पाटील, आशिष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांच्या शोधासाठी दोन पथके तयार करून ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली. दुपारी दोनच्या सुमारास सुदर्शन पवार यांनी रक्ताचे नमुने घेतले.

 वाघमोडे कासारवाडी येथील डोंगरावर असल्याचे समजताच पोलिस पथकाने त्याला शिताफीने पकडले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक नीकेश खाटमोडे, उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, निरीक्षक विलास भोसले यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. पोलिस निरीक्षक विलास भोसले तपास करत आहेत. अमीरच्या मागे आई, वडील, पत्नी, सहा वर्षीय मुलगी व पाच वर्षीय मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदन कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आले. रात्री उशिरा अंबप येथील मुस्लिम दफनभूमीत अमीरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
error: Content is protected !!